Sarava

Vyanktesh Madgulkar

Sarava

आपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि दुसरा ग्रामीण वाचक. ग्रामीण भागातल्या लोकांना काही शहरी शब्द परिचयाचे नसतात आणि शहरी लोकांना ग्रामीण शब्द परिचयाचे नसतात. ‘स र वा’ हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही. कोरडवाहू जमिनीत भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात; काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे ‘स र वा’ वेचणं. ज्यांना धान्याचं मोल फार कळलेलं असतं, ते ‘स र वा’ वेचतात. नाटक, कादंबरी, लघुकथा, ललित लेख यांचं पीक निघाल्यावर लेखकापाशी ‘स र वा’ पडलेला राहतो. तो वेचण्याची चिकाटी दाखवावी, असं मी म्हणत होतो. जे काही गोळा झालं, ते म्हणजे पसा-कुडता. त्यात दाणे निघतील, खडे-मातीही निघेल. सरव्यात हेही येतंच.